Ad will apear here
Next
आत्मीयतेने मोफत जेवू घालणारे लंगरवाले...

इतक्या उंचावर जिथे सर्व महाग मिळतं, तिथे हे लंगरवाले यात्रेकरूंना मोफत चविष्ट अन्न खाऊ घालतात. आश्चर्य म्हणजे अन्न वाढताना कसलाही अहंकार नाही, का कटू, कोरडा व्यवहार नाही. अत्यंत प्रेमाने, आर्जवतेने ते यात्रेकरूंना आपल्या लंगरमध्ये बोलावत असतात. जणू त्यांच्यातच एक सशक्त स्पर्धा असते, कोण जास्त यात्रेकरूंना खाऊ घालेल, कोणाचं अन्न जास्त रुचकर.. याची... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा अकरावा भाग..
............................................
शेकडो तंबूंचं ते छोटंसं गाव होतं; पण मला छोटी पाठीवरील बॅग घ्यायची होती. त्यासाठी मला पुन्हा बाहेर जावं लागेल का..? याक्षणी बॅग कुठे मिळेल, या विचारात मी होतो. सर्व तपास यंत्रणेतून तपासल्या जाऊन नुकताच मी आत बेस कॅंपमध्ये आलो होतो. आता कुठे बॅग मिळेल.. पुन्हा कॅंपच्या बाहेर जावं लागेल का..? या विचारात पडलो. परत आल्यावर आपला तंबू नेमका लक्षात येणार नाही, सापडणार नाही याची शंका मला होतीच, कारण सर्व तंबू जवळपास एकाच रंगाचे होते.

देवदार वृक्षांच्या भागात वसलेलं ते  ‘तंबूस्तान’ होतं. शेतातून वा जंगलातून एखादी पगदंडी पायवाट जावी तसे त्या तंबूस्तानात ओळीने तंबू लागलेले होते. त्यात प्रत्येक ओळीत पायवाटसदृश अगदी अरुंद एक रस्ता होता. माझा तंबू लक्षात ठेवण्यासाठी मी एका देवनार वृक्षाची खूण लक्षात ठेवून एका अरुंद पायवाटेने बाहेर पडलो. तंबूस्तानातून बाहेर पडताच आश्चर्याचा धक्का बसला.! उजवीकडे दुकानं लागली होती. तिथे गरम कपडे, टॉर्चेस, फळफळावळ, बॅग्स आणि विविध स्टेशनरी दुकाने होती. संपूर्ण वैद्यकीय सुविधा, दवाखानेही होते. पोलिस आणि सैन्य दलाने संरक्षित केलेलं ते एक छोटंसं तात्पुरतं तयार केलेलं छोटंसं गावच होतं. समोर रस्ते मिळणारा एक छोटा चौक होता. सगळीकडे लाईट्सचा चकचकाट होता.

दुकानांना लागूनच दुसऱ्या भागात खुप सारे लंगर होते. तिथे अगदी मोबाईल चार्ज करण्यासाठीही दुकान होतं, जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण माझ्या मोबाईलच्या चार्जिंगचा मोठा प्रश्न होताच. मी प्रथम माझ्यासाठी एक छोटी बॅग घेतली. एक केशरी रंगाची लोकरीची कानटोपी घेतली. तोवर सूर्यास्त होऊन अंधार पडला होता आणि लंगरमध्ये जेवणाची गडबड सुरू झाली. झकासपैकी मोठयाने गाणी वाजू लागली. मी सर्व लंगर पाहून आलो. प्रत्येक लंगरमध्ये प्रथमदर्शनी भागात शंकराची मूर्ती होती. मराठी लोकांमध्ये शंकराची पूजा फक्त शिवपिंडीनेच करतात. मूर्ती घरात ठेवत नाहीत, कारण ती फक्त स्मशानात असावी असा एक विचार आहे; पण उत्तर भारतात शंकराची मूर्ती असते.

माझा तंबू शोधून मी नवी घेतलेली माझी बॅग ठेऊन आलो. हवे ते महत्त्वाचे गरम कपडे, चेहऱ्याला लावायचे क्रीम्स, खाण्याचं सामान त्या छोट्या बॅगेत ठेवलं आणि पाठीवरील वेताळ म्हणजे मोठी रकसॅक त्या बेस कॅंपमधील लॉकर रूममध्ये ठेवायला निघालो. तंबूवाल्याने सामान चोरीला जाऊ नये म्हणून काही सूचना दिल्या होत्या. टेंटच्या शेवटच्या भागात वस्तू ठेवू नयेत वगैरे.. शेवटी आपल्या सामानाची जबाबदारी आपणच घ्यावी असं सांगितलं होतं. तंबुवाला जबाबदार नसेल हे स्पष्ट सांगितलं होतं.

लॉकर रूम खूप समोर होती. त्याच रस्त्याने दुसऱ्या दिवशी चंदनवाडीला जायचंय हे कळल्यावर उत्साह आला. लॉकर रूममध्ये बॅग ठेवली. आजवर माझी ही रकसॅक माझ्या सर्व प्रवासात सोबत असायची, पण यावेळी प्रथमच ती नसणार होती. कारण ती प्रचंड वजनदार होती. सामानासकट दहा ते बारा किलो वजन होतं. परत बेस कॅंपच्या प्रमुख भागात आलो. आजूबाजूला चैतन्यानं भारलेलं वातावरण होतं. 

लंगरमध्ये आरती सुरू होती. ‘बम बम भोले’च्या जयघोषाने वातावरण भरून गेलं होतं. सुग्रास जेवणाचा सुगंध येत होता. अस्सल उत्तर भारतीय जेवण सगळीकडे होतं. दालफ्राय, पनीर, बटाट्याची भाजी, सरसो का साग आणि  मक्के की रोटी पंजाबी लंगरला मिळत होती. जेवण्यासाठी टेबल खुर्च्याही मांडलेल्या होत्या. याशिवाय चहा, कॉफी, आटीव दूध सगळीकडे उपलब्ध होते. 

कोणत्याही व्यक्तीला बघताक्षणी वाटेल हे हॉटेल्स किंवा धाबे आहेत आणि इथे खायचे पदार्थ, अन्न विकत घ्यावं लागेल; पण इथेच भारतीय, हिंदू संस्कृतीचं दर्शन होतं. अमरनाथ यात्रा म्हणूनच महान आहे. या सर्व सुसज्ज लंगरमध्ये मोफत खायला मिळतं. इतक्या उंचावर जिथे सर्व महाग मिळतं, तिथे हे लंगरवाले यात्रेकरूंना मोफत चविष्ट अन्न खाऊ घालतात. आश्चर्य म्हणजे अन्न वाढताना कसलाही अहंकार नाही, का कटू, कोरडा व्यवहार नाही. अत्यंत प्रेमाने, आर्जवतेने ते यात्रेकरूंना आपल्या लंगरमध्ये बोलावत असतात. जणू त्यांच्यातच एक सशक्त स्पर्धा असते, कोण जास्त यात्रेकरूंना खाऊ घालेल, कोणाचं अन्न जास्त रुचकर.. याची.

मला हे दृश्य प्रचंड भावलं. भावना उचंबळून आल्या. पाऊस, थंडी सहन करत ते चाळीस दिवस मोफत अन्न खाऊ घालत असतात. याबदल्यात ते यात्रेकरूंकडून काहीही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. फक्त जेवण झालं की किमान आपलं ताट, वाटी बाहेर ठेवलेल्या योग्य डब्यात टाकावेत. मी माझं आवडतं सरसो का साग आणि पोळी जेवलो. पोटाचं टेन्शन मला होतंच, कारण ते सुरवातीपासूनच माझ्यावर चिडलेलं, बिघडलेलं होतं. तेवढ्यात एक गुजराती लंगर दिसला. त्यात सुग्रास मऊ गरम खिचडी आणि गरम कढी मिळत होती. तिथेही जेवलो. एका लंगरमध्ये गरम दूध प्यायलो.

एव्हाना थंडी वाढली होती. मी माझा मोबाईल तेथील काश्मिरी दुकानात चार्जिंगसाठी ठेवला होता. पण तो चार्ज व्हायला बराच वेळ असल्याने मी परत माझ्या तंबूत आलो. आत आणखी तिघेजण वाढलेले दिसले. ते पन्नाशीतील तिघेजण गोरखपूरचे होते. काही जुजबी विचारपूस झाल्यावर कळलं की त्यांची ही दुसरी यात्रा आहे. आमच्या तंबूत  अगदी कमी व्होल्टेजचा बल्ब लावलेला होता. पांघरायला ब्लॅंकेट्स दिले होते. 

रात्री तंबूत त्या गोरखपूरच्या एका माणसाने नेपाळ आणि उत्तर प्रदेशातील माओवादी आणि भारतीय लोकांचं नेपाळमध्ये वर्चस्व याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ते ऐकताना मजा वाटली. रात्री मोबाईल घेऊन आलो. पूर्ण चार्ज झालाच नव्हता, कारण माझं चार्जर मी घरीच विसरलो होतो. थंडी बरीच वाढली होती. तंबूत येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं होतं. पायी यात्रा दुसऱ्या दिवशी सुरू होणार होती, याचं थ्रील वाटत होतं, पण तब्येत ठीक वाटत नव्हती. सर्वजण आपापल्या ग्रुपमध्ये लोकांसोबत आले होते; मी मात्र एकटाच आलो होतो.

रात्री उशिरा झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा शेजारील गोरखपूरचे लोक जागेवर नव्हते. नीट जागा होऊन आधी मी माझ्या डोक्याजवळील बॅग बघितली. माझी  बॅग तिथे नव्हती...


(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU  या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZXKBK
Similar Posts
‘आवो भोले.. पिस्सू टॉपतक घोडा कर लो..!’ आजूबाजूला शुभ्र बर्फ होता, पण चालायच्या वाटेवरचा बर्फ माती, चिखल आणि धुळीनी काळवंडला होता. बर्फातही मळलेली वाट असते. दोन्ही बाजूंना असलेले उभे, उंच पर्वत धीर खचवत होते. खळाळती नदी उत्साह वाढवत होती. माझी पिस्सू टॉपची कठीण चढाई सुरू झाली होती... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या
पिस्सू टॉप सगळ्यात मोठं, उभं, उंचच उंच संकट, टास्क, चॅलेंज पुढे उभं ठाकलं होतं. त्याचं नाव म्हणजे ‘पिस्सू टॉप’. अमरनाथ यात्रेत जे दरवर्षी मृत्यू होतात त्यात दोन ठिकाणी सगळ्यात जास्त मृत्यू होतात. एक पिस्सू टॉप आणि दुसरा शेषनाग. पिस्सू टॉपच्या खडतरपणाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. मी जन्मभर कधीही विसरणार नाही असा अनुभव पिस्सू टॉपने दिला
..आणि सामान्य माणूसही होतो जिगरबाज सैनिक.. अमरनाथ यात्रा पुढे धार्मिक न राहता ती हळूहळू राष्ट्रीय यात्रा होऊ लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता तिथे जाणारा सामान्य माणूसही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो
..आणि माझी अवस्था विक्रमादित्यासारखी झाली मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत पहलगामला यावं लागणार होतं. बॅगरूपी वेताळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणं केवळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के. काय करावं..? माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारल्याने संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language